शहरात 5 महिन्यांत 11 हजार 272 नव्या मालमत्तांची नोंद

0
273

पिंपरी दि. २२ (पीसीबी)  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मालमत्ता नोंदणीचा आलेख उंचावला असून गेल्या 5 महिन्यांत शहरात तब्बल 11 हजार 272 नव्या मालमत्तांची नोंद झाली आहे. त्यातून महापालिकेस दरवर्षी लाखो उत्पन्न मिळणार आहे.

सर्वाधिक 3 हजार 61 मालमत्तांची नोंद वाकड भागात झाली आहे. त्यापाठोपाठ 2 हजार 145 मालमत्ता चिखली परिसरात, 993 मालमत्ता मोशीत, तर 849 मालमत्ता थेरगाव परिसरात वाढल्या आहेत. नव्याने नोंद झालेल्या एकूण 11 हजार 272 मालमत्तांपैकी सर्वाधिक 9 हजार 800  मालमत्ता या निवासी आहेत. तर, 909 मालमत्ता बिगरनिवासी आहेत. औद्योगिक 23, मोकळ्या जमिनी 411, मिश्र मालमत्ता 71 आणि इतर मालमत्ता 58 आहेत. या नव्या मालमत्तांची नोंद झाल्याने महापालिकेस दरवर्षी लाखो उत्पन्न मिळणार आहे.

दरम्यान, 31 मार्च 2022 पर्यंत महापालिकेकडे एकूण 5 लाख 71 हजार 552 मालमत्तांची नोंद झाली होती. 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या कालावधीत वरील मालमत्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण नोंदविलेले 5 लाख 82 हजार 824  मालमत्ता शहरात आहेत. शहरात नव्या मालमत्तांची नोंद घरबसल्या महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावरून करता येणार आहे. त्या सुविधेचा लाभ नागरिक घेत आहेत. नव्याने खरेदी केलेल्या मालमत्तांची तत्काळ नोंद करावी. तसेच मुदतीमध्ये कर भरून मालमत्ताधारकांनी विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.