शहरात सोमवारी स्वयंसेवकांची मांदियाळी

0
227

विनायकराव थोरात यांचा अभिष्टचिंतन सोहळा

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भय्याजी जोशी आणि प्रांत संघचालक नाना जाधव यांच्यासह संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मांदियाळी सोमवारी (दि. ५ जानेवारी) चिंचवड येथे येणार आहे. शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील स्वयंसेवकांसोबत भय्याजी जोशी संवाद साधणार आहेत.

संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य असलेले विनायकराव थोरात यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त संघाचे राज्यभरातील पदाधिकारी व स्वयंसेवक या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसह विनायकराव थोरात यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. भाजपाचे अमोल थोरात यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे.

संघाची प्रार्थना, कार्य, ध्येय याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच विनायकराव थोरात यांनी केलेले संघकार्य, घडवलेले स्वयंसेवक तसेच संघामुळे त्यांची झालेली जडणघडण याबाबत माहितीपटातून त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. स्वयंसेवकांशी संवाद साधत भय्याजी जोशी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे स्वयंसेवकांची कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होणार आहे.