शहरात पाणीबाणी; शहराच्या सर्वच भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी

0
357

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे संपूर्ण शहरात पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून ऐन दिवाळीत पाणीबाणी सुरु आहे. शहराच्या सर्वच भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. दुरुस्ती कामासाठी 42 तास शटडाऊन घ्यावा लागला. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारर्यंत सुरळीत होईल. आज सकाळपासून पाणीपुरवठा सुरु केला असून टप्प्या-टप्प्याने सर्वच भागाला पाणीपुरवठा होईल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

26 ऑक्टोबर रोजी रावेत येथे टप्पा 3 ला पाणीपुरवठा करणा-या 1400 मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीला अचानक गळती सुरु झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवावी लागली.ऐन दिवाळीत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी (दि.26) सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मागील तीन वर्षांपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. बुधवारी सायंकाळी थेरगाव, संत तुकारामनगर, चिखली, जाधववाडी या भागाला पाणी पुरवठा होणार होता. परंतु, जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे या भागातून पाणीपुरवठ्याच्या सर्वाधिक तक्रारी येत आहेत.

दुरुस्ती कामासाठी सुमारे 40 ते 42 तास शटडाऊन घ्यावा लागला. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे सर्व नियोजन कोलमोडले. शहराच्या सर्वच भागात पाण्याची समस्या गंभीर झाली. सगळीकडूनच पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. गुरुवारी रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. पंप सुरु करत टाक्या भरुन घेतल्यानंतर सकाळपासून पाणीपुरवठा सुरु केला आहे. बुधवारी सायंकाळी ज्या भागाला पाणीपुरवठा झाला नव्हता. त्या भागाला प्राधान्याने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

आज सकाळपासून पाणीपुरवठा सुरु केला आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत शहराच्या सर्वच भागातून तक्रारी येत आहेत. दुरुस्तीमुळे जवळपास 40 ते 42 तास पाणीपुरवठा बंद होता. थेरगाव, संत तुकारामनगर पिंपरी, चिखली, जाधववाडी या भागातून तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. या भागाला पाडव्यादिवशी पाणीपुरवठा झाला नव्हता. या भागातील नागरिकांना प्राधान्याने पाणी दिले जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले. मंगळवारर्यंत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असेही त्यांनी सांगितले.