पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वे क्षण पूर्ण झाले असून १८ हजार ६०६ फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ४ हजार ४२२ तर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वात कमी १ हजार १२० फेरीवाले आढळून आले आहेत. शहरात गेल्या आठ वर्षांत ९ हजार ५८१ नवीन फेरीवाल्यांची भर पडली आहे. या फेरीवाल्यांची मार्चअखेर यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालयात यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहरात कामगार, कष्टकरी, उद्योजक यांचा अधिवास अधिक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. शहराच्या इंडेक्समध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून यामध्ये नागरिक आणि फेरीवाले यांची भूमिका महत्वाची आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमुळे फेरीवाल्यांची यादी प्रसिध्द करण्यास विलंब झाला आहे. यादी प्रसिध्द होताच फेरीवाल्यांना हरकती व सूचनांसाठी एक महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. भूमी व जिंदगी विभाग योग्य हरकतींचा विचार करण्यात
येणार आहे. त्यानंतर शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतर फेरीवाल्यांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. शहरात २०१४ मध्ये ९ हजार २५ फेरीवाले होते. तर यानंतच्या आठ वर्षांत शहरातील फेरीवाल्यांची संख्या दुप्पट म्हणजे १८ हजार ६०६ इतकी झाली आहे. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात ४ हजार ४२२, व’ मध्ये १ हजार ९३९, ‘क’ मध्ये २ हजार ४४०, ‘ड’ मध्ये १ हजार १२०, ‘ई’ मध्ये १ हजार ८३२, ‘फ’ मध्ये २ हजार ९४८, ‘ग’ मध्ये १ हजार ६६२ तर ‘ह’ मध्ये २ हजार २४३ फेरीवाले आहेत.