शहरात आत्तापर्यंत 9 जनावरांना लम्पीची लागण; 1800 जनावरांचे लसीकरण

0
354

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – लम्पी विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात आत्तापर्यंत 9 जनावरांना लम्पीची लागण झाली असून पालिकेतर्फे 1800 पेक्षा जास्त जनावरांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.

लम्पी विषाणूने राज्यात थैमान घातले आहे. लम्पीमुळे आत्तापर्यंत जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार 500 आहे. आतापर्यंत 9 लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळली आहेत. सुरूवातीला लागण झालेली 7 जनावरे बरी झाले आहेत. तर, 2 जनावरे बरे होण्याच्या मार्गावर आहेत. जनावरांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने दोन पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या पथकांमध्ये 1 डॉक्‍टर, 1 पशुधन पर्यवेक्षक,1 मदतनीस असे तिघांची दोन पथके आहेत. दरम्यान, शहरात शर्यतीसाठी बैल आणि दुधासाठी गोधन पाळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. शहरात लम्पी आजाराचा शिरकाव होताच अनेक पशू पालकांनी, बैलगाडा मालकांनी आपल्या जनावरांचे स्वःखर्चाने लसीकरण केले आहे. त्यामुळे महापालिका आणि खासगी नागरिकांनी असे शहरातील 85 टक्के जनावरांचे लसीकरण झाले आहे. त्यानंतरही शहरातील प्रत्येक गोठ्याची पशुवैद्यकीय विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. ज्या जनावरांचे लसीकरण बाकी आहे, त्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे उपायुक्त ढोले यांनी सांगितले