शहरात अजितदादांच्या राष्ट्रवादीतही खदखद, पण कशासाठी ? थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
283

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) :  महायुती अंतर्गतची गटबाजी आणि विधानसभा उमेदवारीच्या मुद्यांवर पिंपरी चिंचवड शहरात भाजप बरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखदही समोर आली. पक्षाचे शहर प्रवक्ते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, नव्याने शहराध्यक्ष होऊ पाहणारे माजी नगरसेवक मयूर कलाटे, जेष्ठ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे यांनी पत्रकार परिषद घेत बार टाकला. म्हणे, चिंचवडची जागा जी वाटणीत भाजपकडे आहे ती राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे आणि पडेल नव्हे तर नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. अशा विचारांचे सर्व मिळून २० माजी नगरसेवक असून जर का, या मागणीची पूर्तता झाली नाहीच तर प्रसंगी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी किंवा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हातात घेऊ. खरे तर, ही मागणी म्हणजे एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच थेट आव्हान आहे. दुसरा अर्थ भाजपचे संभाव्य उमेदवार शंकरशेठ जगताप यांच्या उमेदवारीला भाजप अंतर्गत जितका विरोध आहे तितकाच तो राष्ट्रवादीमध्ये आहे, हे दर्शविण्याचा प्रयत्न. तिसरा अर्थ दोन वेळा निवडणूक हारलेले नाना काटे यांना नकोत तर, मयूर कलाटे, प्रशांत शितोळ आणि एकदा अपक्ष लढलेल्या मोरेश्वर भोंडवे यांना संधी पाहिजे. पूर्वी प्रमाणे जगताप कुटुंबाचे वर्चस्व किंवा नेतृत्व यापैकी एकालाही मान्य नाही, हा सर्वाच्या मागणीतील एक समान दुवा.

भाजप बरोबर राष्ट्रवादीची महायुती असल्याने जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार चिंचवडची जागा भाजपकडेच राहणार. दिवंगत लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोनदा भाजपचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची धर्मपत्नी आश्विनी या पोटनिवडणुकित आमदार झाल्या. आता त्याच घरातून जगताप यांचे धाकटे बंधू शंकरशेठ जगताप यांची पालखी उचलायची वेळ येणार. नव्याने भरारी घेऊ पाहणाऱ्यांचा या घराणेशाहीला विरोध आहे. युतीचा धर्म पाळायचा म्हणून राष्ट्रवादीच्या तमाम अजितदादा निष्ठावंतांना भाजपच्या कमळाचाच प्रचार करावा लागणार, ही मजबुरी आहे. गेली दहा-बारा वर्षे राजकारण करताना ज्या जगताप कुटुंबाच्या विरोधात लढाई करत स्वतःचे अस्तित्व टिकवले आता पुन्हा माना खाली घालून अपमान गिळून त्यांचाच प्रचार करावा लागणार. पुढे चार महिन्यांनी महापालिका निवडणूक आलीच तर, अनेकांना स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याची चिंता लागून राहिली. मुळात दोन वर्षे त्या निवडणुका होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. ज्यांची विचारांची बांधीलकी आहे त्यांच्यासाठी हे खूप मोठे वैचारीक द्वंद्व आहे, ते कोणालाही न परवडणारे आहे. आणखी महत्वाचे एक कारण म्हणजे या सर्वांचे नेते अजितदादांची जागावाटपात प्रदेश पातळीवर होणारी घसरगुंडी तसेच संघासह भाजप आणि पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेकडून पावला पावलावर होणारी मानहानी, कोंडी. दादांचे जहाज बारामतीच्या खडकावर आदळले आणि भोकं पडली, आता पिंपरी चिंचवडमध्ये ते कायमचे बुडते की काय याचा घोर दादा समर्थकांना लागून राहिलाय. म्हणूनच चिंचवडची जागा दादांच्या राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे या मागणीत अनेक अर्थांनी तथ्य आहे. हक्काच्या पिंपरी राखीव मतदारसंघात आताच पराभवाची चर्चा रंगली आहे. भोसरीत डाळ शिजत नाही आणि चिंचवड हाताला लागत नाही म्हणून राष्ट्रवादीचा मासा फडफडतोय.

आमदार बनसोडेंचा स्वःअस्तित्वासाठी एल्गार –
आमदार अण्णा बनसोडे गेल्या पंधरा वर्षांत कधीही खराळवाडीच्या पक्ष कार्यालयात फिरकलेले नाहीत. पक्षाच्या बैठका, मोर्चे, आंदोलनात किंवा सोहळ्यातसुध्दा आजवर कधीच दिसले नाहीत. गेल्या आठवड्यात त्यांनी पहिल्यांदाच बैठक घेतली आणि चिंचवड, भोसरी विधानसभेची जागासुध्दा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. पक्षाच्या बैठकित तसा ठरावसुध्दा केला पण, यावेळी पक्षाच्या ३६ माजी नगरसेवकांपैकी दोन-तीन अपवाद वगळता एकही नेता किंवा सव्वाशेवर माजी पदाधिकाऱ्यांपैकी कोणी उपस्थित नव्हते. पिंपरी राखीव मतदारसंघात आमदार बनसोडे हे मधील पाच वर्षांचा अपवाद वगळता दोन टर्म आमदार आहेत. आता तिसऱ्यांदा त्यांना संधी पाहिजे म्हणून प्रयत्न आहे. आजवर शहरातील एकाही प्रश्नावर ते विधीमंडळात बोलले नाहीत, पिंपरी राखीव मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आणला नाही. लोकांसाठी ते कधीच उपलब्ध नसतात किंवा त्यांचा संपर्क दुर्मिळ असतो आदी असंख्य तक्रारींचा पाढा सुरू आहे. त्यांच्याबद्द साचलेली नाराजी शहरातील राष्ट्रवादीच्याच मुळावर येऊ शकते. पक्षाची ही एकमेव जागा गेलीच तर कुंकवाचा धनी कोण, असा प्रश्न भेडसावत असल्याने राष्ट्रवादीच्या दहा-बारा बड्या माजी नगरसेवकांनी मिळून बनसोडे यांच्या विरोधात थेट अजितदादांकडेच गाऱ्हाणे केले. चिंचवड, भोसरी भाजपकडे असताना एकमेव पिंपरी राखीव राष्ट्रवादीकडे आहे, आणि उद्या तिथेही पराभव झालाच तर आगामी राजकारण कठिण होऊन बसेल याची काळजी असंख्य दादाप्रेमींना आहे. उद्याच्याला महापालिकेत आठ-दहा नगरसेवक ते स्वबळावर निवडूण आणतील अशीही त्यांची क्षमता नाही. आमदार बनसोडे यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्याशी खूप जवळीक साधली, तेव्हाच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनात पाल चुकचुकली. गेल्या महिनाभरात ते शरद पवार यांनाही भेटल्याच्या बातम्या झळकल्याने त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली. फाटाफुटीत एकमेव अजितदादा प्रेमी ही ओळख किती बेगडी होती ते उघड झाले. दोन-तीन महिने शहर राष्ट्रवादीला शहराध्यक्ष नाही आणि आमदार ती जबाबदारी घेत नाही किंवा त्यांची खालावलेली प्रतिमा पाहून त्यांच्याकडे ती सोपवायला अजितदादासुध्दा तयार नाहीत. योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे अशी नावे फक्त चर्चेत आहेत. अजित गव्हाणे साहेबांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर अजून साधा शहराध्यक्षही निवडता आला नाही या चर्चेने कार्यकर्ते खचलेत. राष्ट्रवादीसाठ ही लक्षणे ठिक नाहीत.

भाजपची बैठक हे पेल्यातले वादळ –
भाजपनेही पक्ष कार्यालयात नेत्यांची एक बैठक झाली आणि त्यात पिंपरीच्या जागेसाठी सर्वांनी मिळून शड्डू ठोकला. आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रवक्ते राजू दुर्गे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना नंतर पत्रकारांकडे व्यक्त केल्या. चिंचवड, भोसरी भाजपकडे आहेच, पण पिंपरी विधानसभेचीही त्यांनी मागणी केली. भाजपनेही तसा ठराव केला आणि राष्ट्रवादी विरोधात राळ ओकली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी कळविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिस्तबध्द भाजपने राष्ट्रवादीकडील पिंपरीची जागा मागितली मात्र, बंडाची भाषा कुठेही केली नाही. खरे तर, आमदार बनसोडे यांच्या विरोधात मतदारांत तीव्र नाराजी असल्याने महायुती ही जागा गमावण्याची चिंता भाजपलाही आहे. पिंपरी राखीव मतदारसंघातच विधान परिषदेचे दोन्ही भाजप आमदार राहतात. राज्यसभेची खासदारकी ज्यांना बहाल करण्यात आली होती त्या अमर साबळे यांचे निवासस्थान पिंपरी राखीव मतदारसंघातच आहे. यापूर्वी शहरात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेली अण्णा भाऊ साठे महामंडळ, प्राधिकरण अध्यक्ष पद, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष अशी सर्व पदे याच मतदारसंघातच दिली होती. भाजपने याच मतदारसंघात सर्वाधिक ताकद दिली, मात्र तिथे आमदार राष्ट्रवादीचा आहे, याची खंत भाजपतील अनेकांना आहे. म्हणूनच राष्ट्रवादीचा प्रचार कऱणार नाही, असे म्हणत सर्वांनी मिळून आव्वाज टाकला. एक प्रकारे गलितगात्र होत चाललेल्या दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपनेही संधी साधली. दादांचे गरुड घायाळ झाल्याने आता टोची मारायचेच काम केले.

आता महायुतीच धोक्यात येऊ शकते –
दादांच्या राष्ट्रवादीची शहरात आजही मोठी ताकद आहे. खरे तर, भाजपमधील दोन्ही आमदारांसह अर्धीअधिक माजी नगरसेवकांची फौज राष्ट्रवादीचीच आहे. किमान शहरातील भाजपचे जहाज बुडायला लागले याचा अंदाज आल्याने सगळे उंदिर जीव वाचवण्यासाठी बाहेर पडणार आहेत. अशा परिस्थिती त्यांना दादांची राष्ट्रवादी जवळची वाटत नाही तर साहेबांची राष्ट्रवादी सोयिची वाटते. भाजपमध्ये ज्या माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारी विरोधात रान पेटवले ते इशारे देतात की वेळ पडलीच तर आम्हीसुध्दा तुतारी हातात घेऊ. दादांच्या राष्ट्रवादीचे जे जे आजी-माजी पदाधिकारी त्रस्त आहेत तेसुध्दा उघडपणे बोलतात आम्हाला तुतारीचा पर्याय आहे. किमान चिंचवड आणि पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात दादांच्या राष्ट्रवादीत जे खदखदतेय ते या पक्षाच्या अस्तित्वालाच सुरूंग लावणार आहे. भाजपमध्ये महेश लांडगेंच्या भोसरीतील उमेदवारीवर माजी सदस्य नाराज आहेत. चिंचवड, पिंपरीत तेच चित्र आहे. तीनही ठिकाणी महायुतीची हवा दिसते पण, असंतोष शमला नाही तर होत्याचे नव्हते होऊ शकते. अजितदादा सावध असा !!!