शहरातून पीएमपीला डिसेंबरमध्ये 11 कोटींचे उत्पन्न

0
252

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) — पीएमपीची दिवसेंदिवस प्रवाशी संख्या वाढत असून त्यामधून मिळणारे उत्पन्न देखील वाढत आहे. पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न डिसेंबरमध्ये 51 कोटी 77 लाख रूपये प्राप्त झाले आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा 11 कोटी 35 लाखांचा वाटा आहे. उल्लेखनीय बाब अशी की पीएमपीचे एकूण 15 डेपो आहेत, त्यापैकी केवळ 3 डेपो पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. तरीही सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न पिंपरी-चिंचवडने मिळवून दिले आहे.

उद्योगनगरीकडून भरपूर उत्पन्न, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भरपूर निधी एवढे सगळे मिळत असूनही पिंपरी-चिंचवडला पीएमपीकडून सापत्न वागणूक मिळत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी प्रवाशी वाहतुकीसाठी पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पीएमपीकडून दोन्ही शहरात सुमारे दीड हजारपेक्षा जास्त बस धावत आहेत. यामध्ये 40 टक्के बस या पीएमपीच्या मालकीच्या तर 60 टक्के बस या भाडे तत्वावरील आहेत. दिवसभरात दोन्ही शहराच्या हद्दीत पीएमपीतून दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

पीएमपीचे उत्पन्न वाढीसाठी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. बकोरिया यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे. पीएमपीने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पीएमपीला नोव्हेंबरमध्ये 51 कोटी 5 लाख रूपये उत्पन्न मिळाले असून डिसेंबरमध्ये 51 कोटी 77 लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीचे तीन डेपो आहेत. यामध्ये निगडी डेपोतून 4 कोटी 94 लाख, भोसरी डेपोतून 3 कोटी 79 लाख 30 हजार तर पिंपरी डेपोतून 2 कोटी 61 लाख 79 हजार असे 11 कोटी 35 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

उत्पन्न वाढीबरोबरच प्रवाशांना जलद, शाश्‍वत आणि भरवश्‍याची सेवा देण्यासाठी प्रशासनात काही बदल केले आहेत. तर काही वेळा ब्रेक डाऊनमुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून सतत ब्रेक डाऊन होणाऱ्या बस संचलनातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तोट्यात असलेल्या मार्गावरील बसची संख्या कमी करून गर्दीच्या ठिकाणी बसची संख्या वाढवली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.