पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 569 श्वान मालकांनी श्वानासाठी ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचे सुलभीकरण करून त्या जलदगतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे. ऑनलाइन पध्दतीने विविध सेवा देण्याकडे महापालिकेचा कल असून नागरिकांच्या वेळेत बचत व्हावी, या उद्देशाने या सेवा परिणामकारक ठरत आहे. महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाळीव प्राण्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी डॉगशेल्टर सुरू करण्यात आले आहेत.
परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये, असा शासन नियम आहे. त्यानुसार पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत श्वान मालकास श्वान परवाना दिला जातो. यामध्ये श्वान मालकास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपूर्ण प्रक्रिया करुन घ्यावी लागते. त्यामुळे अनेक श्वान मालक अधिकृत परवाना घेत नव्हते. याचाच विचार करून महापालिकेने हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना 4 ऑगस्ट 2022 पासून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाइन श्वान परवाना उपलब्ध करून दिला आहे. 18 ऑक्टोबरअखेर शहरातील विविध भागातून 569 श्वान मालकांनी ऑनलाइन परवाना घेतला आहे.