शहरातील १७ पब, बारच्या अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाई

0
179

कल्याणीनगरमधील भीषण अपघातानंतर शहरातील पब, बारची झाडाझडती घेण्यास सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. गेल्या तीन दिवसांत १४ पथकांमार्फत राबविलेल्या धडक मोहिमेत ३२ परवानाधारक आस्थापनांवर कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार या अनुज्ञप्तींचे व्यवहार तत्काळ प्रभावाने बंद ठेवले असून सर्व अनुज्ञप्ती सील केल्या आहेत.

या कारवाईत १० रुफटॉप, अंदाजे १६ पब, इतर ६ परवाना कक्ष बार अशा एकूण ३२ अनुज्ञप्तींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोझी, ब्लॅक बार नंतर विमाननगरमधील द ग्रँड क्लब अँड बारवर देखील सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. २०२३-२०२४ मध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून एकूण २९७ अनुज्ञप्तींवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंद केले होते. त्यामध्ये १ कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. १७ अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली असून २ अनुज्ञप्त्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२४ पासून आजतागायत ५४ अनुज्ञप्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून असून ५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, एकूण ३२ अनुज्ञप्त्या सील करण्यात आल्या आहेत.

विमाननगरच्या ‘द ग्रँड क्लब अँड बार’ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. या ठिकाणीही अल्पवयीन मुलांना मद्य पुरवले जात असल्याचे समोर आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘द ग्रँड क्लब अँड बार’मध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. तेथील रजिस्टर तपासण्यात आले. तसेच सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. या ठिकाणी अल्पवयीन मुलांना विदेशी मद्य दिले जात असल्याचे वास्तव या कारवाईमध्ये समोर आले. उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत हा बार सील केला असून मुद्देमाल जप्त केला आहे.

परवाने बंद ठेवलेले बार
यामध्ये हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, द ग्रँड क्लब अँड बार हॉटेल, ट्रेस कॉमास हॉस्पिटॅलिटी, हॉटेल सेवन सीज हॉस्पिटॅलिटी, फूडस्पीड हॉस्पिटॅलिटी, २ बीएचके (मायरा हॉस्पिटॅलिटी), हॉटेल सरोवर अँड लॉजिंग, पॅराडाईज रेस्ट्रो, हॉटेल लिवार्ड, रास वेंचर्स, एस. आर. हॉस्पिटॅलिटी, न्यूट्री प्रीझम हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, एम अँड एम हॉस्पिटॅलिटी, व्हीजन हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, जयानंद बार अँड रेस्टॉरंट, ट्रम्प वेंचर्स (एजंट जॅक्स बार), बायलामोस हॉस्पिटॅलिटी, ड्रीप सो हाय, आपना अड्डा रेस्टॉरंट अँड बार, हॉटेल फँटम हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल महेश्वरी हॉस्पिटॅलिटी, वर्ल्ड किंग, हॉटेल सानिका, हॉटेल हृदय पॅलेस, हॉटेल सागर शुभम, हॉटेल डीलक्स, हॉटेल कृषीराज, हॉटेल स्वामीराज, हॉटेल पिंगारा, हॉटेल सर्वज्ञ अशी परवाने बंद ठेवण्यात आलेल्या हॉटेलची नावे आहेत.