शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, व भुमिपूजन

0
227

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी दि. ९ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, भुमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित असतील. यासोबतच या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप तसेच माजी नगरसदस्य,नगरसदस्या यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दुपारी २ वाजता या कार्यक्रमास सुरूवात होणार असून नाशिक फाटा येथे कासारवाडी एसटीपी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रुग्णालयाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या निवासस्थान इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर पिंपरी येथील महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी, अजमेरा येथे सेन्ट्रल मॉलजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचेही उद्घाटन होणार आहे.

यानंतर दत्त मंदीर रस्ता, माऊली चौक, वाकड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे भूमीपूजन तसेच एम. एम. चौक डी मार्ट शेजारी, काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनसाठी उभारण्यात आलेले काळेवाडी ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन संपन्न होणार आहे.

यानंतर श्रीकृपा सोसायटी शेजारी, आनंदनगर, सांगवी येथील नुतनीकृत जलतरण तलावाचे लोकार्पण आणि सार्वजनिक बांधकाम मैदान (पी. डब्लू. डी. मैदान) जुनी सांगवी येथे मॅकेनिकल स्वीपर्सद्वारे रस्ते स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.