नविन थेरगाव रुग्णालयाला भेट देवून कामकाजाची केली पाहणी
पिंपरी, दि.६ (पीसीबी): महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी महापलिका सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये अनुभवी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जागतिक सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे. रुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना सर्वोत्तम सेवा देण्याकरिता महापलिका कटिबद्ध आहे, अशी माहिती आयुक्त् शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी थेरगाव येथील मनपाच्या नविन रुग्णालयास भेट दिली. तसेच, रुग्णालयातील सर्व विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयीन कामकाजाकरिता आवश्यक उपकरणे तातडीने उपलब्ध करून देणेबाबत संबंधित वैद्यकीय अधिका-यांना सूचना केल्या. यावेळी, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, रुग्णालय प्रमुख अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर, डॉ.रविंद्र मंडपे व थेरगाव रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रसंगी, आयुक्त शेखर सिंह यांनी विविध विषयांवर चर्चा केली. रुग्णालयाचे कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने चालावे, यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
तसेच, डॉक्टर व कर्मचा-यांच्या कामकाजाचे आणि व्यवस्थापनाचे कौतुक करत रुग्णालयामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध तांत्रिक सुविधा, मनुष्यबळ व्यवस्थापन, कामकाजाचे नियोजन अशा अनेक विषयांसंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले. भेटीदरम्यान ऑक्सिजन प्लांट मधून आय.सी.यु. बेड साठी O2 कनेक्शन देणे, त्यासाठी आवश्यक असणारे टेंडर काढणे, टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर करणे, एम.आर.आय. विभागात पिं.चिं.मनपा रुग्णालयातील रेफरल व बाहेरचे रुग्णालयातील रेफरल याबाबतच्या नोंदी ठेवणे, ओ.पी.डी. केसपेपर साठी डिजिटल रेकॉर्डसाठीची प्रक्रिया करून घेणे, रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची ड्युटी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मा. आयुक्तांनी रुग्णालयात आवश्यक असणा-या सर्व सुधारणा करून कामकाजाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाबाबत माहिती दिली.