शहरातील रस्त्यांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करा

0
295

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची अधिका-यांना सूचना

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पावसाळा संपला असून शहरातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला गती द्यावी. डिसेंबरअखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. देहुरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील सेवा रस्त्यासाठीच्या संपूर्ण जागेचे भूसंपादन करावे. गृहनिर्माण सोसायटी धारकांना सर्व सोयी-सुविधा द्याव्यात. पीएमआरडीए हद्दीतील गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असून या सोसायट्यांवर कारवाई करण्याचे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधांबाबत खासदार बारणे यांनी गुरुवारी महापालिका, पीएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचआयच्या अधिका-यांसोबत बैठक घेतली. पायाभूत सुविधा, पाणी, ड्रेनेज, पवना नदी प्रदूषण, वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम,एमएसआरडीसी, एनएचआयचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, पाऊस थांबला आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला सुरुवात करावी. पुनावळे, वाकड, ताथवडेतील डीपी रस्ते, मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेतमधील रस्ते, फुटपाथ विकसित करण्याच्या कामाला गती द्यावी. पवनानदीवर मामुर्डी ते सांगवडे दरम्यान हिंजवडीला जाण्यासाठी पूल बांधण्याचे काम हाती घ्यावे. रस्त्यांची कामे डिसेंबअखेरपर्यंत पूर्ण करावीत. कामाचा दर्जा राखावा.

शहराच्या चारही बाजुंनी मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत. महापालिका बांधकाम व्यावसायिकांकडून डेव्हलपमेंट शुल्क घेते. त्यामुळे त्यांना सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. गृहप्रकल्प उभारण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. या कालावधीत महापालिकेने रस्ते, पाणी, वीज सुविधा निर्माण करावी. त्यामुळे सर्वांगीण विकास होईल. सोसायट्यांमधील नागिरकांच्या तक्रारी दूर होतील. निगडी पर्यंत मेट्रोला मान्यता मिळाली आहे. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यासाठीची आवश्यक असलेली लाईट पोल, विद्युत तारा शिफ्टींगची प्रस्तावित कामे हाती घ्यावीत.
प्रवाशी वाहतूक करणा-या खासगी बस प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये उभ्या राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या बस कोठे थांबतात, त्याची माहिती घ्यावी. महापालिका आणि पीएमआरडीएने खासगी बस स्थानक उभारण्याचे निर्देशही खासदार बारणे यांनी दिले. अनेक ठिकाणच्या ड्रेनेज लाईन थेट नदीपात्रात सोडल्या आहेत. पीएमआरडीए हद्द मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. त्यामुळे पीएमआरडीएने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत. थेट पाणी सोडणा-या गृहप्रकल्पांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

देहुरोड – कात्रज बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी बारा मीटर रुंदीचा सेवा रस्ता प्रस्तावित आहे. मामुर्डीपासून वाकडपर्यंत बाह्यवळण मार्ग 60 मीटर रुंद आहे. त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी 12 मीटर रुंद सेवा रस्ता प्रस्तावित आहे. तो विकसित करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखवली आहे. त्यासाठी महापालिकेने भूसंपादन कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी घेतलेल्या विशेष शिबिरात 60 टक्के भूसंपादन झाले आहे. 70 टक्के जागेचे भूसंपादन झाल्याशिवाय कामाची निविदा काढता येत नाही. त्यामुळे उर्वरित जागेचे भूसंपादन करण्याची सूचना खासदार बारणे यांनी दिली. लवकरात लवकर उर्वरित जागेचे भूसंपादन करण्याची ग्वाही महापालिका आयुक्त सिंह यांनी दिली.