शहरातील झोपडपट्टी वासियांना होणार महिला बचत गटांच्या महिलांमार्फत सेवाकर बीलांचे वितरण व सर्वेक्षण

0
4
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचा उपक्रम

पिंपरी, दि. ६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाकडील रहिवाशांचे सेवाकरांच्या बिलांचे वितरण आणि झोपडपट्टी वासियांचे सर्वेक्षण महिला बचत गटांच्या मार्फत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजिविका केंद्राच्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या मार्फत हे काम केले जाणार आहे. या उपक्रमात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना झोपडपट्टयांमधील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

समाज विकास विभागाकडील दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत पवना शहर स्तरीय संघ स्थापन करण्यात आलेला आहे. या अंतर्गत महिला बचत गटांची जोडणी करण्यात आली असून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हा सिद्धी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. महिला सक्षमी करणासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत असून आता झोपडपट्टी वासियांच्या सर्वेक्षणाचे कामही महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात वर्ष २००२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ७१ झोपडपट्टया आहेत. त्यापैकी ५५ झोपडपट्टयांना सेवाकराची बिले झोपडीधारकांना देण्यात येतात. मात्र सेवाशुल्क बिले भरण्याबाबत नागरिकांची उदासिनता दिसून येते. आता बचत गटांच्या महिला या ऑनलाईन अॅप द्वारे झोपडपट्टी वासियांचे सर्वेक्षण करून त्यांना सेवाशुल्कांची बिले वितरीत करून नागरिकांची जनजागृती करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात २३ हजारांवर बिलांचे केले जाणार वाटप
सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २३ हजार ७७८ बिलांचे वितरण महिला बचत गटांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच ज्या झोपडीधारकांची नोंद नाही परंतु झोपडी अस्तित्वात आहे, व त्यांना सेवाशुल्क बिल येत नसेल, अशा झोपडीधारकांची मोबाईल अॅप द्वारे नोंदणी या महिला बचत गटांच्या महिलांमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी महिला बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

ऑनलाइन पद्धतीने माहितीचे संकलन
सर्वेक्षण करणाऱ्या महिला झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवाशी असून त्यांच्या मार्फत सेवाशुल्क बिलांचे वितरण करून सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारी माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना महानगरपालिकेचे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाने ओळखपत्र दिलेले आहे. तसेच यासाठी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि समाज विकास विभागाचे समूह संघटक नियुक्त केले आहेत. तरी फोटो पासधारक व ज्यांच्या नावे सेवा कराची बिले येतात, त्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.