शहरातील खड्डे चार दिवसात बुजवा

0
61

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना

दि. 3 ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी – शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहरातील रस्त्यांवरील खड्डे चार दिवसात बुजविण्याचे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. वाहतूक कोंडी होणा-या ‘स्पॉट’वर, चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी संदर्भात खासदार बारणे यांनी शनिवारी (दि.3) महापालिका अधिकारी, पोलिसांची एकत्रित बैठक घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, वाहतूक पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, प्रेरणा शंकर, देवण्णा गट्टूवार, सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, निगडीचे वाहतूक पोलीस निरीक्षक शंकर बाबर, वाकडचे सुनील पिंजन, वाहतूक सल्लागार प्रताप भोसले यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावरील खड्डे हे वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे. खड्ड्यामुळे वाहनांचा वेग संथ होत आहे. त्यासाठी कोल्ड मिक्स, खडी, पेव्हिंग ब्लॉक, सिंमेंट कॉन्क्रीटने येत्या चार दिवसात सर्व खड्डे बुजविण्यात यावेत. पिंपरीतील साई चौक, वाकडमधील लक्ष्मी चौक, हिंजवडी आयटी पार्कमधील सुर्या हॉस्पिटल, भूजबळ, भूमकर चौकडून येणारी वाहतूक वाकडकडे वळविली आहे. त्यामुळे तिथे मोठी वाहतूक कोंडी होते. डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटल दरम्यान दोन्ही बाजूने कोंडी होते. रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड हा झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. महापालिकेला या भागातील नागरिकांकडून मोठा मालमत्ता कर मिळतो. पण, त्या कराच्या तुलनेत नागरिकांना सेवा मिळत नाहीत. त्यामुळे कराच्या 40 टक्के रक्कम या भागातील विकास कामांवर खर्च करावी.

किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपासमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा डीपीआर मंजुरीसाठी पाठविला आहे. परंतु, जुना ठेकेदार (रिलायन्स) उच्च न्यायालयात गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने 12 मीटर आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 12 मीटरचा सेवा रस्ता विकसित करावा. जेणेकरुन या रस्त्यावरुन नागरिक ये-जा करतील. त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होईल अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. याबाबत एनएचआयच्या अधिकारी बाळासाहेब टोंक आणि कदम यांनाही सूचना केल्या आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची या कामासाठी मंगळवारी पुन्हा भेट घेणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

खासगी ट्रॅव्हलसाठी जागा निश्चित करा
शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या घरात गेली आहे. खासगी ट्रॅव्हलने प्रवास ही नागरिकांची गरज झाली आहे. या ट्रॅव्हल रस्त्यावर उभ्या राहत असल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी ज्या भागात ट्रॅव्हल थांबतात. त्या भागात महापालिकेने ट्रॅव्हलसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करावी. त्याचे शुल्क ट्रॅव्हल व्यावसायिकांकडून वसूल करावे. पिंपरीतील एच.ए मैदान, निगडी, प्राधिकरणात वाहनतळाची व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

शहरात कच-याचे साम्राज्य
यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई होत नाही. या ठेकेदाराकडून काम केले जात नाही. ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. रस्त्याच्या कडेला कचरा, माती साचली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कच-यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अस्वच्छतेमुळे साथीचे आजारही वाढत आहेत. त्यामुळे शहरात साफसफाई ठेवावी. कोठेही कचरा साचणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिले.

शहरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. सतत पडणा-या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे तीन दिवसात बुजविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शहरात कोठेही कचरा साचणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले आहेत. वाहतूक कोंडी होणारी ठिकाणी निश्चित करावीत. तिथे पोलीस तैनात करावेत अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. याबाबत 15 दिवसांनी पुन्हा आढावा घेणार आहे.