पिंपरी दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील भविष्यात उद्भवणाऱ्या पार्किंग समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करून दळणवळण सुव्यवस्थित करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले. दळणवळण विषयक व्यवस्थापन करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने पार्किंग समस्यवर दीर्घकालीन मार्ग शोधल्यास शहराच्या विकासाबरोबर पार्किंगचा प्रश्न देखील सहजतेने सोडवण्यासाठी पाऊल उचलावे असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या वतीने शहरातील पार्किंगबाबतच्या प्रश्न आणि समस्यांवरील उपाययोजनांबाबत सर्वंकश चर्चा करण्यासाठी पार्किंग विषयक यंत्रणा तसेच पार्किंग विषयक नियोजन करणाऱ्या खाजगी संस्थांबरोबर बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगररचना उप संचालक प्रसाद गायकवाड, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, सहायक नगररचना उप संचालक प्रशांत शिंपी, सहायक आयुक्त शितल वाकडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रशांत पाटील, प्रशासन अधिकारी मुकुंद कोळप, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, विजया कारंडे, प्रसाद गोकुळे, दिपक साळुंखे यांच्यासह अर्बन वर्क्स, सेप्ट युनिवर्सिटी, अर्बन लॅब या संस्थांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त वाघ म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे शहरात अनेक समस्या आणि आव्हाने देखील निर्माण झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात दळणवळण, रहदारीचे वाढते प्रमाण विचारात घेणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या अंदाजे 27 लाख एवढी आहे. 2041 मध्ये लोकसंख्येपेक्षा शहरात वाहनांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पार्किंगचा विचार केला तर भयावह चित्र निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचा गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीत असावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. तसेच नागरी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका विविध प्रयत्न करत आहे.