शहराचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यात सफाईमित्रांचा मोलाचा वाटा

0
54

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ व सुंदर राखून शहराचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यात सफाईमित्रांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे आरोग्य जर सुस्थितीत राहिले तरच शहराचे आरोग्य सुस्थितीत राहील. यासाठी वेळोवेळी महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन केले जाते. याद्वारे त्यांच्यामध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात “स्वभाव-स्वच्छता, संस्कार- स्वच्छता” यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज क, ई आणि फ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त खोराटे बोलत होते.

या कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच सहाय्यक आरोग्य आणि वैद्यकीय अधिकारी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य आणि वैद्यकीय विभागामार्फत मागील वर्षीही सफाई कर्ममचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सफाई कर्मचारी वर्षभर आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असतात. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांना बऱ्याच आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बऱ्याचवेळा आरोग्य कर्मचारी या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या या समस्यांना जाणून घेऊन त्यांच्या प्राथमिक तपासण्या करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांच्या या समस्या दूर करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. तपासण्या केल्यानंतर महापालिकेच्या दवाखाने तसेच रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार असून जास्तीत जास्त सफाई कर्मचाऱ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या सहकाऱ्यांनाही या शिबीराचा लाभ घेण्याबाबत अवगत करावे, असे आवाहन खोराटे यांनी यावेळी केले.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, दर सहा महिन्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येते. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त “स्वभाव-स्वच्छता, संस्कार- स्वच्छता” यावर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील सफाईमित्र आरोग्य तपासणी शिबीर हा विशेष उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविला जात आहे. याद्वारे सफाई कर्मचाऱ्यांना मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या आजारांपासून बचाव करण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून त्यांच्या प्राथमिक तपासण्या करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे. शहर स्वच्छ ठेवण्यात आपले सफाई मित्र दिवसरात्र काम करत असतात. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत सफाई कर्मचाऱ्यांनीही जागरूक राहून वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

शिबीराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सफाई कर्मचाऱ्यांनी आज विविध प्राथमिक तपासण्या करून घेतल्या. या शिबिराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य येळे, सुत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राजेश आगळे यांनी मानले.
स्वच्छतादुतांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणारी पिंपरी चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका