शहरवासीयांनो, ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेत सहभागी व्हा; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

0
490

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीग अंतर्गत कचरा मुक्त शहरासाठी पीसीएमसी पायोनिअर्सचे शनिवारी (दि.17)  रोजी आयोजन करण्यात आले आहे. या लीगमध्ये शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी होऊन नोंदणी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर, जनसंपर्क विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले. याच अंतर्गत शहर कचरा मुक्त करण्यासाठी पीसीएमसी पायोनिअर्सचे उद्या (शनिवार) सकाळी साडेसात वाजता प्लॉगेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची ब्रॅन्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे.

उपायुक्त अजय चारठणकर म्हणाले, “पीसीएमसी पायोनिअर्स अंतर्गत शहरातील 8 क्षेत्रीय कार्यालयामधील वेताळ महाराज घाट, जुनी सांगवी, मोरया गोसावी मंदिर, चिंचवडगाव, पिंपळे गुरव विसर्जन घाट ते डायनोसॉर पार्क, कैजू देवी बोट क्‍लब एरिया, थेरगाव, त्रिवेणीनगर चौक ते भक्ती-शक्ती चौक, दुर्गा देवी उद्यान निगडी, भारतमाता चौक ते इंद्रायणी नदी घाट, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते पी.सी.एम.सी डेपो सदगुरू नगर भोसरी सहल केंद्र या ठिकाणी प्लॉगेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे”.

देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले. जेवढे नागरिक यामध्ये नोंदणी करतील, तेवढे शहराला रॅंकिग मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी innovateindia.mygov.in/swachhyouthral या संकेतस्तळावर नोंदणी करून शहराला विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.