शहरवासियांसाठी निराशाजनक अंदाजपत्रक; ठोस प्रकल्पांचा अभाव – राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची टीका…

0
357

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) :- महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (दि. 14) सादर केलेले अंदाजपत्रक हे शहरवासियांची निराशा करणारे ठरले असून या अंदाजपत्रकात एकाही नविन अथवा ठोस प्रकल्पाचा समावेश नाही. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्प चालू वर्षात सुरू होतील, असा मुलामा अंदाजपत्रकात लावण्यात आल्यामुळे भाजपच्या पाच वर्षांच्या काळातील अपयशी प्रकल्पांची कबुलीच याद्वारे देण्यात आल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

महापालिकेचे चाळीसावे व प्रशासकाचे पहिले अंदाजपत्रक शेखर सिंह यांनी आज सादर केले. या अंदाजपत्रकावर भाष्य करणारे प्रसिद्धीपत्रक अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, चालू वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये नदीसुधार प्रकल्प, तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनीतील डोळ्यांचे रुग्णालय, पीपीपी तत्वावर कॅन्सर हॉस्पीटल, वेस्ट टू एनर्जी, महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, बायोगॅस प्रकल्प चालू वर्षात सुरू होतील, असे आजच्या अंदाजपत्रकात म्हटले आहे.

वरील सर्व प्रकल्प हे भाजपच्या काळात मान्यता देऊन त्याच्या वर्कऑर्डरही काढण्यात आल्या आहेत. यापूर्वीचेच प्रकल्प नव्याने दाखवून ते सुरू करण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे हे गेल्या पाच वर्षांपासून रखडल्याचेच अधोरेखीत करण्यात आले आहे. भाजपकडून जे प्रकल्प सुरू केल्याचा दावा सातत्याने केला जातो ते प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत, हेच प्रशासकांनी कबुल केले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नही घटल्याची कबुली दिली आहे. गतवर्षीच्या उत्पन्नाचा अंदाज आणि यंदाच्या उत्पन्नाच्या अंदाजात तीनशे कोटींहून अधिक रक्कमेची तफावत असल्यामुळे त्याचा शहरविकासावर परिणाम होणार आहे. केवळ जुन्याच योजनांना मुलामा देऊन नव्याने सादर करण्यात आलेले हे अंदाजपत्रक असल्याने शहरवासियांची घोर निराशा झाल्याचेही गव्हाणे यांनी या पत्रकात म्हटले आहे.