सहा पिस्तूल, सहा काडतुसे जप्त
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पिंपरी आणि गुन्हे शाखा युनिट तीनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात अल्पवयीन मुलांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई पिंपरी पोलिसांनी डेअरी फार्म रोडवर केली. चार अल्पवयीन मुलांकडून चार पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्ताजी कवठेकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अल्पवयीन मुले आणि त्यांना पिस्तूल पुरवणारा पप्पीसिंग (३५, उमरटी, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेअरी फार्म रोडवर चार मुले पिस्तूल घेऊन कोणालातरी भेटण्यासाठी आली असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता प्रत्येकाकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी दोन लाख दोन हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री मोरेवस्ती, चिखली येथे करण्यात आली. तीन अल्पवयीन मुलांसह अथर्व सोपान मारणे (१९, आंबेगाव बुद्रुक, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरेवस्ती येथील भीमशक्ती नगर येथे चौघेजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तर अथर्व मारणे याला अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.