दि . ९ ( पीसीबी ) – मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी ही प्रायव्हेट पायलट झाली आहे. स्वतः शरद पोंक्षे यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी लेकीसाठी खास पोस्ट लिहित तिच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे.
शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. ‘सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली. असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी,’ अशी भावूक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सिद्धीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी यावर्षी जून महिन्यात परदेशात गेली होती. त्यावेळी त्यांनी सिद्धी परदेशात शिकण्यासाठी जात असताना विमानतळावरचे काही फोटो शेअर करत तिच्यासाठी एक भावूक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असे लिहिले होते. आता तिचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे.
सिद्धी पोंक्षे ही लहानपणापासूनच शालेय शिक्षणात हुशार होती. बारावीमध्ये असताना तिने विज्ञान शाखेत 87 टक्के गुण मिळवले होते. त्यावेळीही शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी लेकीच्या कौतुकात त्यांनी म्हटले होते की, ‘2019 साली माझे कर्करोगावरील उपचार चालू होते. रुग्णालयामध्ये येऊन कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेंशनमध्ये असतानाही पिल्लूने 87 टक्के मार्क 12 विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहूबाजूनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते.
शरद पोंक्षे यांना सिद्धी आणि स्नेह ही दोन मुले आहेत. सिद्धी वैमानिक झाली तर स्नेहने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक टीममध्ये स्नेहने काम केले आहे.