शरद पवार ८० व्या वर्षी दौरे करतात, अजित पवार सकाळी सहाला टेबलावर असतात, तुम्ही किती दौरे केले…

0
347

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ८० वर्षांचे असतांना दौरे करतात, आमच्या जिल्ह्यात ते तीनदा येऊन गेले. अजितदादांचा तर मला हेवा वाटतो, ते सकाळी सहाला टेबलावर असतात. लोकांना भेटतात, सरपंचांशी चर्चा करतात, प्रश्न सोडवतात. पण आदित्य ठाकरेंनी किती दौरे केले, ते माझ्या जिल्ह्यात एकदा तरी आले का ? असा सवाल करत गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर टीका केली.

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पास झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन ठरावावर बोलतांना गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भाषण केले. शिवसेना नेतृत्वावर टीका करतांनाच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मात्र कौतुक केले.

गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना पक्ष रसातळाला गेला, नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही चौथ्या क्रमांकावर गेलो. तरीही नेते गांभीर्याने पहायला तयार नाही. आदित्य ठाकरे तरुण मंत्री असतांना दौरे करू शकत होते, पण त्यांनी महाराष्ट्रात किती दौरे केले हे एकदा तपासून पहावे.

या उलट ८० वर्षांचे शरद पवार आमच्या जिल्ह्यात तीनवेळा येऊन गेले, जयंत पाटील तर सतत येत असतात. अजितदादांचा तर मला हेवा वाटतो, नेता असावा तर असा. ते सकाळी सहा वाजता टेबलवर असतात. लोकांना भेटतात, गावातील सरपंचाशी चर्चा करतात, त्यांचे प्रश्न सोडवतात. आमचे नेते मात्र कधी बाहेर पडले नाही आणि कोणाला भेटलेही नाही. मंत्र्यांना भेटत होते, पण आमदार, पदाधिकाऱ्यांना त्यांची भेट दुर्लभ झाली होती. मग त्यांनी आपली गाऱ्हाणी कोणापुढे मांडायची हा प्रश्न होता. उद्धव ठाकरे आणि आमच्यातली दरी त्यांच्या भोवतालच्या चार कोंबड्यानी वाढवली, आम्हाला त्यांच्यापासून दूर केले. आज तेच आमच्यावर आरोप करत आहेत की, आम्ही बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून हटवलं.

आम्ही आजही शिवसैनिक आहोत आणि मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार. उद्धव ठाकरे यांना आम्ही कधीही त्रास देणार नाही. पण पक्ष रसातळाला जात असतांना, बाळासाहेबांचे हिंदुत्व धोक्यात आलेले असतांना शांतही बसणार नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले.