बीड, दि. २२ (पीसीबी) : राज्याच्या व देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार हे चमत्कार घडवू शकतात, असा विश्वास जनतेला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी हाच राज्यातील नंबर एकचा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे यश कायम टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रिपणे प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, आगामी काळाता राज्याच्या राजकारणात नवीन काही समिकरणे निर्माण होण्याचे हे संकेत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
बीड येथील कार्यकारणी आढावा बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. गेल्या तीन दिवसांपासून जयंत पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर होते. बीड येथील बैठकीत त्यांनी मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादीच्या यशात बीड जिल्ह्याचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख केला.
जंयत पाटील म्हणाले, बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आपला पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पाहायचे असेल तर पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागून सभासद नोंदणी अभियान यशस्वी केले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गावागावात पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरला. देशाच्या राजकारणात आदरणीय शरद पवारसाहेब कोणताही चमत्कार करु शकतात, हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला आहे. यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी सभासद नोंदणीचा आढावा घेणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी बीड जिल्ह्याचे फार मोठे योगदान आहे. लोकशाहीत निवडणुकांना महत्त्व आहे. त्यामुळे ज्याला पद हवे आहे, त्याला निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी माजी खा. जयसिंगराव गायकवाड, आ. प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर, संजय दौंड, माजी आमदार अमरसिंह पंडीत, राजेश्वर चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदींची उपस्थिती होती.












































