शरद पवार साहेबांची, ‘तुतारी’ पोचतेय घरोघरी..!

0
215

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी चिन्ह घरोघरी पोचविण्यात सक्रिय..!

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नुकतेच ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. त्यातच तुतारी हे मंगल वाद्य मुळातच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते लवकर पोचत असून बहुतांश नागरिकांकडून चिन्हाला पसंती दर्शवली जात आहे.

चिन्ह जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला आणि त्यानंतर तुतारी हे चिन्ह व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे आजपर्यंतचे उल्लेखनीय कार्य विविध माध्यमांतून पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरीकांपर्यंत पोचविण्यात येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये होर्डिंग व कियोस्क लावून नागरिकांना आवाहन करण्यात येत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुतारी हे चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे येत आहे, ज्याला विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींकडून शरद पवार साहेबांबद्दल भावनिक व आश्वासक प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.

नुकतेच निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, कासारवाडी, दुर्गा टेकडी अशा शहरातील विविध भागांमध्ये शहराध्यक्ष तुषार कामठे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्यासह देवेंद्र तायडे, जयंत शिंदे, विशाल जाधव, मयूर जाधव, अल्ताफ शेख, अरुण थोपटे, गणेश भोंडवे, सागर चिंचवडे, संदेश जगताप, गणेश काळे, वंदना आराख, संगीता खरात, मीनेश काची, अनिल शिंदे, लक्ष्मीकांत गालफाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन थेट संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी राजकारणात सध्या चाललेल्या नैतिक दृष्ट्या विघातक कृत्यांबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त करत शरदचंद्र पवार साहेबांच्या भूमिकांचे समर्थन केले.

येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील मावळ लोकसभा तसेच शिरुर लोकसभा अंतर्गतच्या परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी कौल द्यावा यासाठी सर्वच पदाधिकारी एक विचाराने काम करतील असा निर्धार शहर कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांनी केला आहे.