मुंबई, दि. ३१ (पीसीबी): मराठा आरक्षणासाठी मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान इथं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झालेले असताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नेत्यांसह आमदार-खासदारही आझाद मैदानात जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील आझाद मैदानात येण्याची शक्यता वर्तवली असून आज सायंकाळी ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजते.
मराठा आणि कुणबी एकच असल्याने आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण हवं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाची नाराजी ओढावण्याची शक्यता असल्याने सरकारची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीतील नेतेही या आरक्षण प्रश्नावरून कोणती भूमिका घ्यावी, याबाबत संभ्रमात आहे. मात्र आता शरद पवार हे थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदान इथं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही.