शरद पवार राष्ट्रवादीचे तुषार कामठे ‘ऍक्शन मोड’वर..!

0
165
  • प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांना धरले धारेवर..!

पिंपरी : शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर चार फुटांपर्यंत पाणी साचल्याच्या घटना घडल्या, ठिकठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज वहिनी स्वच्छता न केल्याने तसेच ठिकठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जायला लागले, पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर पुढच्या तीन महिन्यामध्ये पावसाळ्याला शहर कसे तोंड देणार? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आक्रमक भूमिका घेत ऍक्शन मोड वर आल्याचे आज दिसून आले.

आज सकाळी तुषार कामठे यांनी निगडी येथील अ प्रभाग तसेच फ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात बहुसंख्य कार्यकर्त्यांसह जनसंवाद बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, दोन दिवसात संत तुकाराम महाराजांचे व संत तुकाराम महाराजांचे पालखी प्रस्थान शहरातून मार्गस्थ होणार असताना लाखो वारकरी बांधवांना महापालिकेच्या गलथान कारभाराचा त्रास होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी पुढाऱ्यांनी आजवर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असून, इथे नागरिकांना सध्या मूलभूत सुविधा महापालिका प्रशासन देऊ शकत नाही, एकीकडे शहर विकासाच्या नावाने मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे एका पावसाने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरावे अशी दयनीय अवस्था सत्ताधारी व महापालिका प्रशासनाच्या गलथानपणामुळे झाली आहे, पावसाळ्याच्या व पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात व आवश्यक त्या यंत्रणा उभाराव्यात, ड्रेनेज व्यवस्था स्वच्छ सुरळीत करणे, आपत्कालीन यंत्रणा बळकट करणे, त्याचबरोबर वारकरी बांधव व शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना यावेळी तुषार कामठे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

एकंदरीतच लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण सज्ज झाले आहेत, त्यातच शहराध्यक्ष तुषार कामठे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविण्यात अग्रेसर व आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

सदर बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, उपाध्यक्ष रेखा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, शहर उपाध्यक्ष दिलीप पानसरे, अनिल भोसले, काशिनाथ जगताप, विनोद धुमाळ, शहर सरचिटणीस सचिन गायकवाड, शहर सचिव योगेश सोनवणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,राष्ट्रवादी ओबीसी विभाग शहराध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष सागर भुजबळ, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष माळी, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष मयूर जाधव, सेवादल शहराध्यक्ष अरुण थोपटे, शरदचंद्र संजीवनी आरोग्य योजना भोसरी विधानसभा अध्यक्ष मंगेश उर्फ राजू खंडागळे व इतर सर्व शहर कार्यकारणी व पदाधिकारी यांचा समावेश होता.