मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं होतं. यानंतर आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत अखेर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे.
जयंत पाटील गेल्या 7 वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष होते. 2018 साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. जयंत पाटील यांनी पदभार हाती घेताच सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला होता. राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली होती. विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचे काम या कालखंडात केले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही पक्षाकडून त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. यानंतर आता अखेर पक्षाकडून प्रदेशाध्यपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.