शरद पवार यांनी केले सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचे स्वागत

0
399

– नुसतं माफी मागून चालणार नाही, व्यवहारामध्ये या वर्गाबाबत भूमिका घेतली पाहिजे…

नागपूर, दि. ८ (पीसीबी) – ‘ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल, अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शरद पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवारांना मोहन भागवतांच्या वक्तव्यावर सवाल विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, “मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलं आहे, ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण, नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा.वि. मिराशी सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं, “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली.”

“वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत”, असेही डॉ. भागवत म्हणाले.