दि.१४(पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या पाच दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पवार यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. आता उपचारानंतर शनिवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादीचे (शरद पवार) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे महत्त्वाची माहिती दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आदरणीय पवार साहेब यांची तब्येत बरी असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. त्यांना तीन चार दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार ते घरीच आराम करणार असून त्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामास सुरुवात करतील.
साहेबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या काळात देश आणि राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर आणि त्यांच्यावर प्रेम करणारे नागरीक यांनी शुभेच्छा पाठविल्या. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
यासोबतच आदरणीय पवार साहेब यांच्यावर उपचार करणारे तसेच त्यांची काळजी घेणारे रुबी हॉल क्लिनिक येथील डॉक्टर्स, परिचारिका, सपोर्टींग स्टाफ यांचेही मनापासून मनापासून आभार.” असेही त्यांनी म्हटले आहे.










































