शरद पवार यांना दुसरा मोठा धक्का, ‘राष्ट्रवादी भवन’ सह सर्व कार्यालये दादांकडे

0
182

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा निकाल आपण नम्रपणे स्वीकारत असल्याचे अजित पवार म्हणाले होते. या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये पुन्हा वाद होण्याचे चिन्ह आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील काही पक्ष कार्यालय ही अजित पवार गटाच्या ताब्यात तर काही जिल्ह्यांमध्ये ती शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ हे मुंबईत आहे. शरद पवार गटाच्या ताब्यात असलेले पक्षाचे हे मुख्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नियमानुसार अजित पवार गट हा बॅलार्ड इस्टेट येथे असलेल्या ‘राष्ट्रवादी भवन’ या पक्षाच्या मुख्यालयावर दावा सांगण्याच्या तयारी आहे. निकालाच्या आधीपासूनच अजित पवार गटाकडून या संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निकालाने त्याला बळ मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यालये ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टची मालमत्ता असल्याचे शरद पवार गटाकडून (Sharad Pawar group) दावा करण्यात येत होता. या वेल्फेअर ट्रस्टवर शरद पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादाची कार्यलय ही शरद पवार यांच्याकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राष्ट्रवादीचे मुख्यालय हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे नसून पक्षाचे असल्याने अजित पवार गटाकडून ते ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पुणे शहरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये वाद झाला होता. शरद पवार गटाच्या ताब्यात असलेले कार्यालय त्यांनी अजित पवार गटाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी त्यावेळी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली होती. तर, हे कार्यालय आपल्या नावावर असल्याचे सांगत शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिले होते.