मुंबई, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षातील आमदारांसह बंड घडवून आणले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना तीसहून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता अजित पवार यांचं बळ वाढविणारे वृत्त आले आहे. शरद पवार गटाला हा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की, संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचं निश्चित केलं.
नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी आज दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय सात आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचं शपथपत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवले आहे.