मुंबई, दि. २७ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना थोपवण्यासाठी सर्व भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आजही कॉंग्रेसचा देशातील २० टक्के जनाधार कायम आहे. तो वाढवता यायला हवा. प्रादेशिक पक्ष कॉंग्रेससारखे देशव्यापी नाहीत. पण, आज पंतप्रधानपदाचा उमेदवार कॉंग्रेसकडे नसेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर करून सर्वपक्षीय ऐक्य साधले गेले पाहिजे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दमनकारी धोरणापासून देश वाचवायची गरज लक्षात घेत कॉंग्रेसने पक्षांतर्गत असणारे प्रश्न तातडीने सोडवावेत. आझाद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चिंतन करावे आणि कारभारात सुधारणा करावी, असेही चव्हाण यांनी सुचविले आहे. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही २३ जणांनी पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. पक्षनेतृत्वाला लिहिलेले हे पत्र ‘लीक’ करण्यात आले. पक्ष वाचवण्याच्या प्रयत्नांची दखल घेत सुधारणा करण्याऐवजी घरातल्या बाबी चव्हाट्यावर मांडण्यात आल्या.
त्यानंतर नेमल्या गेलेल्या तीन समित्यांपैकी सर्वात महत्वाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा हे होते. पण, त्यांचाही अपमान करण्यात आला. गुलाम नबी आझाद कित्येक वर्षे कॉंग्रेस पक्षाचे सिपाही म्हणून काम करत राहिले. पण, त्यांच्या भावनांची दखल घेण्यात आली नाही. आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेण्याऐवजी त्यांना सगळे मिळाले होते. मग त्यांनी पक्ष का सोडला, असे प्रश्न विचारले जात आहेत. पदे देणे म्हणजे कॉंग्रेस पक्ष मुघल सल्तनत आहे का, हे बोलणाऱ्यांनी स्वत:ला विचारुन पाहण्याची गरज आहे.
काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडला जावा. राहुल गांधी किंवा त्यांचे निकटवर्तीय निवडून येऊन अध्यक्ष, पदाधिकारी झाल्यास हरकत नाही. पण निवडून आलेल्या व्यक्तीलाच नैतिक अधिष्ठान असते, हे विसरू नये. कोणत्या अधिकारात राहुल गांधी हे पक्षाबद्दलचे निर्णय घेत आहेत. पराभवाचे चिंतन नाही की चुकांचे विश्लेषण केले जात नाही. हा काय प्रकार आहे. चुकांबाबत उदयपूरच्या पक्षाच्या बैठकीत चिंतन व्हायला पाहिजे होते. पण, त्या ऐवजी त्या बैठकीचे नवसंकल्प शिबिर असे नामकरण करण्यात आले. चुका टाळण्यासाठी चर्चा आवश्यक असते. पण, चर्चा टाळण्याकडेच कल होता. आसाम आणि केरळ येथील निवडणुकात झालेल्या पराभवाची चिकित्सा करण्यासाठी अशोक चव्हाण समिती नेमण्यात आली होती. मात्र, त्या समितीचा अहवालच प्रकाशित केला गेला नाही. अहमद पटेल आज नाहीत, ते कायम पक्षाचा विचार करायचे. पण, त्यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. आमचे पत्र नवी दिशा ठरवू, हे सांगण्यासाठी लिहिले गेले होते.