शरद पवार यांच्या स्वागताना भाजपचे नेते

0
70

धुळे, दि. १६ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज (दि.15) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार सध्या अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी मेळावे घेताना दिसत आहेत. अशातच त्यांनी धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातही शेतकरी मेळावा घेतलाय.

शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार विमानतळावर पोहोचले असता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, भाजप आमदार अमरिश पटेलही शरद पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, अमरिश पटेल स्वागताला आल्याचे दिसल्यानंतर शरद पवार म्हणाले, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथं कसे? यावर प्रत्युत्तर देताना अमरिश पटेल म्हणाले, पक्ष वगैरे काय असतो साहेब? दरम्यान, दोघांकडून मिश्किल टिप्पणी झाल्यानंतर त्याठिकाणी हशा पिकलेला पाहायला मिळाला.

शरद पवार म्हणाले, शिंदखेडा शेतकऱ्यांचा भाग, सत्ताधाऱ्यांना शेतीची अडचण झाली आहे. अनेक शेती विरोधी धोरण सत्ताधाऱ्यांनी राबवले जात आहेत. कांदा उत्पादकाला दोन पैसे द्यायचे असतील तर निर्यात केली पाहिजे. महाराष्ट्रात दोन नंबरचे उत्पादन होते, मोदी सरकार आले आणि अनेक बंधने ऊस उत्पादकांवर घातली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कष्टकरी शेतकऱ्यांचा हा तालुका आहे. मात्र या तालुक्यात गुंडगिरी वाढली आहे. ज्यांना लोकांनी 20 20 वर्ष सत्ता दिली त्यांनी लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी सत्तेचा वापर केला. सत्ता ही लोकांची सेवा करण्यासाठी असते. मात्र सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ज्यांना सत्तेचा उन्माद आला आहे त्यांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे. गेल्या 20 वर्षात विकास झालेला नाही.

शिंदखेडला आल्यानंतर अनेक गोष्टी समजल्या, माझे सहकारी संदीप बेडसे आणि बाकीच्या सहकाऱ्यांनीही काही बाबी माझ्या कानावर घातल्या. हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण दिसत काय… इथे गुंडगिरी सुरू झाली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. खोटे खटले निरपराध लोकांवर भरायचे आणि दमदाटी करून गुंडगिरीचं राज्य आणू शकतो असं चित्र काही लोकांनी उभं केलं आहे. दुर्दैवाने त्यांना २०-२० वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न वापरता ती लोकांवर खटले भर, त्यांना तुरुंगात टाक, त्यांना त्रास दे, सत्तेचा गैरवापर कर म्हणून वापरली जात आहे. हेमंत देशमुखांसारखा माझा एक सहकारी, एक प्रामाणिक माजी मंत्री की जो तुम्हा लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी पडेल ते कष्ट करतो त्यांच्यावर खोटे खटले भरले, असंही शरद पवार म्हणाले.