१९ जुलै (पीसीबी) – निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी आणि बिगुल ही मुक्तचिन्ह गोठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीमध्ये फटका बसल्याचं म्हटलं होतं. तसेच पिपाणी हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून ‘पिपाणी’ आणि ‘बिगुल’ हे चिन्ह गोठवले आहे. ‘पिपाणी’, ‘बिगुल’ ह्या चिन्हाचा ‘तुतारी’ असा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
‘तुतारी वाजवणारा माणूस’ ऐवजी ‘तुतारी’ला मतं!
‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे निवडणूक चिन्ह दिले होते. त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ऐवजी ‘पिपाणी’ला अनेक ठिकाणी मतदान अधिक झाल्याचा राष्ट्रवादीने दावा केला होता. सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर अशा जागांवर पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला लक्षणीय मतं पडली आहेत.
पिपाणी चिन्ह असणाऱ्यांना किती मतं?
पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला मिळणारी मतं फुटली आहेत, असं पवार यांच्या राष्ट्रवादीनं म्हटलं. रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना कित्येक मतं पडली आहेत. आकड्यांत सांगायचे झाल्यास रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना 43 हजार 957 मतं पडली आहेत. त्याच प्रमाणे दिंडोरी या जागेवरून बाबू भगरे (सर) यांना 1 लाख 3 हजार 632 मते पडली आहेत. भिवंडी जागेवर कांचन वखरे यांना 24 हजार 625 मते मिळाली. बारामती या जागेवर शेख सोएलशहा यांना 14 हजार 917 मते पडली आहेत. शिरुरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28 हजार 324, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना 44 हजार 597, बीडमध्ये अशोक थोरात यांना 54 हजार 850 मते, साताऱ्यात संजय गाडे यांना 37 हजार 62 मते पडली आहेत.
…अन्यथा साताऱ्यात पवारांच्या उमेदवाराचा म्हणजेच शशिकांत शिंदे यांचा विजय झाला असता
साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली.