शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेव जाधव यांच्या विरोधात तक्रार

0
343

कोथरूड, दि. १० (पीसीबी) – समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात कोथरूड येथील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी अनेक व्हिडिओ तसेच मुलाखती प्रसार माध्यमांच्या मार्फत प्रकाशित केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे कारण असल्याचा ठप्पा शरद पवार यांच्यावर ठेवला आहे. तसेच काही वादग्रस्त व टोकाची भूमिका घेणारे शब्द ही वापरले आहेत. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या मध्ये संघर्ष निर्माण करणारे अनेक वक्तव्य केल्याचे तसेच शरद पवार यांचे नाव वारंवार घेऊन अनेक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले असल्याचे नमूद करत गुरनानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत नामदेवराव जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा भा. द. वी. कलम १९७, १५३, १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ४९९, ५००, ५०३, ५०४, ५०५ (२) प्रमाणे दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास सदरील व्यक्ति जोमाने जाती धर्माच्या नावाखाली सोशल मीडिया वर खोटी व बनावट माहिती प्रसारित करुन तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहित करेल याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील हे ही गुरनानी यांनी नमूद केले.
या वेळी कोथरूड सामाजिक न्याय विभागाचे विनोद हनवते आणि राष्ट्रवादी युवतीच्या ऋतुजा देशमुख देखील उपस्थित होत्या….