शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतानाचा फोटो दाखवून १८ जणांची फसवणूक

0
558

शिरूर, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतानाचा फोटो दाखवून एकाने १८ जणांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. उत्कर्ष मारुती सातकर (रा. सातकरवाडी, ता.शिरूर) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वाईन शॉपचा परवाना देतो, असे सांगून सातकर याने अनिल पवार (वय ३१, रा.शेरेवस्ती, रांजणगाव, ता.शिरूर) यांना बनावट परवाना दिला. त्यांची ५३ लाखांची फसवणूक केली. अनिल पवार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या पथकाने त्याला दिल्ली येथून ताब्यात घेतलं. पोलिसांनी उत्कर्ष याला आज (गुरुवारी) पहाटे तीनच्या सुमारास शिक्रापुरात आणले. त्याने अशाच प्रकारे सुमारे १८ जणांना फसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जनरल नॉलेज, प्रशासकीय माहिती आणि शरद पवार यांच्यासोबतचे फोटो दाखवून सातकर हा लोकांना प्रभावित करीत असे. वाईन शॉप, बिअर बार याचा परवाना, सरकारी बदल्या, प्रशासकीय अधिका-यांच्या नियुक्त्या अशी कामे करीत असल्याचे सांगून जिल्हाधिका-यांच्या नावाने पत्रेही तो लोकांना देत असे, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी उत्कर्ष सातकर यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांची आई संध्या व पत्नी अंकिता यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. सातकर याने अजून अशा प्रकारे कुणाची फसवणूक केली, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्याची पत्नी अंकिता ही दिल्लीत स्टेट बॅंकेत कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

उत्कर्ष हाही दिल्लीत राहून अशी फसवणूक करीत असल्यांना पोलिसांना संशय आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती किती व कशी हे पुढील तपासात आम्ही निष्पन्न करु, असे प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रकारची फसवणूक झालेल्यांना (९०७७१००१००) या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.