शरद पवार यांच्याकडे इनकमिंग सुसाट, अजितदादांकडे आऊट गोईंग जोरात

0
62

पुणे, दि. 10 (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची होती, तीच आता भारतीय जनता पक्षाची झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेते भाजपला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. शिवाय येत्या काळात असे अनेक धक्के पाहायला मिळतील, असं म्हणत शरद पवारांनी आगामी पक्ष प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

माजी खासदार संजय काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा ओघ सुरु आहे. आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी असलेले संजय काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवारांसोबत दोनवेळा भेट झाल्याचे काकडेंनी म्हटलंय. संजय काकडे हे सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का बसणार आहे.

रामराजे निंबाळकरांचा 14 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता

हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे यांच्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्ष फुटीनंतर साथ देणारे रामराजे निंबाळकर 14 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांचा देखील प्रवेश होण्याची शक्यता बोलली जातीये. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत.

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या रुपाने भाजपला हादरा
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही इंदापुरात तुतारी फुंकलीये. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलीये. इंदापूरची जागा महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे बोलले जात होते. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अखेर हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादीची वाट धरली. गेल्या वेळी केवळ 3 हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी मोठी खेळी केली.

अजितदादांची साथ सोडलेले नेते पुढे लोकसभा निवडणुकीत खासदार झाले त्यामध्ये डॉ. अमोल कोल्हे, निलेश लंके, बजरंग सोनावणे यांची नावे अग्रस्थानी आहेत.

लोकसभेनंतर साथ सोडणाऱ्या नेत्यांमध्ये अजित गव्हाणे, बाबाजानी दुर्राणी, बबनदादा शिंदे यांचा समावेश आहे.

साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या बड्या नेत्यांमध्ये राजेंद्र शिंगणे, रामराजे निंबाळकर, दीपक चव्हाण, नाना काटे, विलास लांडे , सचिन खरात आदी रथीमहारथींची नावे आहेत.