शरद पवार यांचे टार्गेट चिंचवड, नाना काटेंच्या माघारीसाठी फोन

0
81

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील घडामोडींना मोठा वेग आला आहे. शरद पवार यांच्या टार्गेटवर जे मतदारसंघ आहेत त्यात बारामती खालोखाल चिंचवड अग्रस्थानी असल्याचे आज स्पष्ट झाले. अजित पवार यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार नाना काटे यांनी माघार घ्यावी यासाठी दोन दिवसांपूर्वी स्वतः अजित पवार प्रत्यक्ष भेटून गेले. दरम्यान, काल सायंकाळी सहाच्या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार आणि नंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही काटे यांना दूतामार्फत फोन झाला. महायुतीचे उमेदवार भाजपचे शंकर जगताप यांचा पराभव करायचाच असा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. दुपारी तीन पर्यंत माघार झाली तर जगताप विरोधात महाआघाडीचे राहुल कलाटे अशी थेट लढत संभवते. दुसरे अपक्ष भाईसाहेब भोईर हे लढणार असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केल्याने त्यांच्याकडे माघार घेण्यासाठी कोणीही विनंती केलेली नाही. नाना काटे यांच्या उमेदवारीचा मोठा परिणाम भाजप तसेच राष्ट्रवादीच्याही मतांवर संभवतो. मावळ मतदारसंघात दादा समर्थक महायुतीचे सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपसह सर्व विरोधकांनी भक्कम मोट बांधल्याने आता चिंचवडला भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विरोधतील काटे यांची उमेदवारीला महत्व प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी अजितदादा काटे यांना भेटून गेले मात्र, ते माघारीसाठी नव्हे तर तिकडे मावळ मतदारसंघाचा तिढी सुटत नसेल तर, चिंचवडमध्ये भाजप उमदवाराची कोंडी करायची खेळी कऱण्यासाठी आले होते.

अजित पवार यांची दुहेरी खेळी असल्याने मावळ आणि चिंचवड अशा महायुतीच्या दोन्ही जागा अडचणीत साप़डल्या आहेत. अजित पवार यांनी नाना काटे यांची समजूत काढूनही माघार न घेता निवडणूक लढविण्यावरच ते ठाम असल्याने संशय बळावला आहे. काटे यांच्या परिसरात भाजपचा मोठा मतदार आहे तसाच राष्ट्रवादी चाही मतदार आहे. काटे यांना २०२२ च्या पोटनिवडणुकित ९९ हजार मते मिळाली होती आणि अपक्ष राहुल कलाटे यांना ४५ हजार मते होती. मतविभागणी होऊन भाजपच्या अश्विनी जगताप या विजयी झाल्या. आता तोच पॅटर्न वापरायचा आणि मावळात शेळके यांच्या विरोधात भाजपने पुकारलेले बंड मागे घेतेल नाही तर चिंचवडमध्येही दादांची राष्ट्रवादी भाजपला धोका निर्माण करू शकते.
काटे यांची उमेदवारी शरद पवार यांचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठीही अडचणीची असल्याने माघारीसाठी खुद्द पवार साहेब आणि नंतर जयंत पाटील यांनी फोन केला. फोनवर त्यांनी आपल्या विनंतीला मान द्यावा आणि माघार घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केल्याचे स्वतः काटे यांनी सांगितले. जगताप विरोधात कलाटे अशी सरळ दुरंगी लढत झालीच तर भाजपचा पराभव सहज शक्य असल्याचे सर्वेक्षणातील अंदाज आहेत. भाजपचा हा बालेकिल्ला पडला तर अजितदादांच्या ताब्यातून पिंपरी चिंचवड शहर हिसकावून घेणे सहज शक्य असल्याची अटकळ साहेबांच्या राष्ट्रवादीची आहे. दरम्यान, दुपारी याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचे काटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.