शरद पवार यांची तब्बेत खालावली, तातडिने उपचार सुरू

0
3

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अचानक थकवा आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे तातडीने दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

तातडीने रुग्णालयात हलवले :
आज सकाळी शरद पवार यांना प्रकृतीत अस्वस्थता जाणवू लागली. काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणाचा त्रास होत असल्याचे समजते. प्रकृती खालावल्याची चिन्हे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळातही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालयात दाखल होताच काही मिनिटांत त्यांना सलाईन लावण्यात आले. थकवा आणि शरीरातील कमजोरी लक्षात घेऊन डॉक्टरांनी आवश्यक उपचार प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली आहेत.

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली. बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट केले असून त्यांना हायड्रेशनचा त्रास जाणवत होता, असे त्यांनी स्पष्ट केले. काही वैद्यकीय तपासण्या बाकी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार त्यांनी आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे मानले आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यातही याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले होते. त्यावेळी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा अशक्तपणा वाढल्याने त्यांना पुन्हा दाखल करावे लागले. डॉक्टरांकडून पुढील काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. पुढील वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती जाहीर होणार आहे.