शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही – अजित पवार गटाचा निर्णय

0
287

मुंबई, दि. १० (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यापुढे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्र लावणार नाही. त्याऐवजी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र आमच्या पक्षाच्या सर्व बॅनरवर लावण्यात येईल, असे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांनी स्थापन केला, हे जयंत पाटील यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. आता अजित पवार हेच या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत’ असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा, याविषयी न्यायालयात होणारा युक्तिवाद हा मराठी नाही तर इंग्रजीत होत आहे. मात्र अश्रू ढाळणाऱ्यांना तेथील युक्तिवाद कोणत्या भाषेत मेरिटवर होतो हे समजू शकलेले नाही’, असा टोलाही तटकरे यांनी सोमवारी शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य समर्थकांना लगावला आहे.

युक्तिवादाच्या भाषेचे आकलन न झालेली मंडळीच लोकांमध्ये वेगळे चित्र निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोप तटकरे यांनी केला. ‘काल-परवा काहींच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा उल्लेख न्यायालयात एकेरी पद्धतीने झाला असा दावा करताना अश्रूला वाट देत कथित मोकळेपणाने सांगण्याचा उद्योग काहींनी केला’, असा टोला तटकरे यांनी लगावला आहे.

ज्या युक्तिवादाची माहिती घेतली त्यामध्ये जो उल्लेख एका पॅरामध्ये करण्यात आला, त्याचा संदर्भ पूर्वीचा आहे. आधीच्या याचिकेतील जो निर्णय दिला गेला होता, त्यातील पॅरा वाचण्यात आला. अनेक वेळा इंग्रजीमध्ये उल्लेख करताना तो असा युक्तिवाद होत असतो. मराठीत आदरातिथ्य म्हणून ‘ते’ म्हणत असतो. त्यामुळे तिथे होणारा युक्तिवाद हा मराठीत नाही’, असेही तटकरे यांचे म्हणणे आहे.