दि.१४(पीसीबी)-अजितदादांचे अपघाती निधन, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी, त्यांची राज्यसभेतील रिक्त जागा, राष्ट्रवादीचे विलिनीकरण अशा घाडमोडीत अजून एक बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार हे 2 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होत आहेत. विधानसभेत महायुतीचे पारडे जड आहे. महाविकास आघाडी एकत्रित येऊन राज्यसभेची एक जागा निवडून आणू शकते. त्यामुळे या जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेसेना आणि काँग्रेस शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अनुकूल आहे.
विधानसभेतील संख्याबळ काय?
शरद पवार यांच्यासह त्यांच्याच गटाच्या परभणीच्या खासदार फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. हे सर्व निवृत्त होत आहेत.
तर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे 131, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 57, अजित पवार पक्षाचे 40 असे महायुतीचे एकूण 228 आमदार आहेत. अपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे सहा खासदार निवडून जातील. यामध्ये भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार निवडून जाईल.










































