शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत, टोमॅटो फेकून निषेध

0
274

नाशिक, दि. ८ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ओझर विमानतळावरुन कळवण येथे जात असतांना वणी येथे बिरसा मुंडा चौकाजवळ अजित पवार यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे, टोमॅटो व कांद्याचे कॅरेट रस्त्यावर ओतून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.या प्रकरणी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष शाम हिरे, दिंडोरी- पेठ विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे व संदीप बेरेपाटील यांना पोलिंसानी ताब्यात घेतले असून वणी पोलिस ठाण्यात चौकशी सुरु आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कळवण येथे जात असतांना नियोजना प्रमाणे वणी येथे अजित पवार यांचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यासाठी सकाळी दहा वाजेपासून सज्ज होते.

सकाळी १०.४० मिनीटांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा ताफा वणी येथे बिरसा मुंडा चौकात येवून थांबल्यानंतर पाठोपाठ सकाळी १०. ४२ वाजेच्या दरम्यान अजित पवार यांच्या वाहन पुढे जावून स्थानिकांकडून स्वागत व सत्कार स्विकारण्यासाठी बिरसा मुंडा चौकात थांबले.

पाठीमागेच सर्वसाधारण पन्नास मीटर अंतरावर पोलिंसाच्या गुप्त विभागास चकवा देत गनिमी काव्याचा अवलंब करुन निषेधाच्या तयारीत असलेले शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष शाम हिरे, दिंडोरी- पेठ विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे व संदीप बेरेपाटील यांनी वाहानांच्या ताफ्यावर काळे झेंडे दाखवत टोमॅटो व कांदा फेकून निषेध नोंदवला.

शरद पवार यांच्या नावाचा जयघोष करण्यास सुरुवात केली. यावेळी सदरची बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर आंदोलनकर्त्यां तिघा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून वणी पोलिस ठाण्यात दाखल केले. याबाबत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांची चौकशी व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.