शरद पवार ओबीसी म्हणणाऱ्या नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तोंडाला काळे फासत मारहाण

0
348

पुणे,दि.१८(पीसीबी) – मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधव यांना काळं फासण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळेच हे कृत्य केल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे.

पुण्यात पत्रकार भवनजवळ पत्रकारांशी संवाद साधताना नामदेवराव जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. कार्यकर्त्यांनी थेट जवळ येऊन जाधव यांच्या तोंडाला शाई फासली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकानं जाधवांभोवतीकडं केलं. पण तरीही कार्यकर्ते जाधव यांच्यावर धाऊन जात होते. यावेळी हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या.

पवार साहेबांविरोधात ते वारंवार विधानं करत आहेत. आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल. हे कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे. यापूर्वी हा व्यक्ती शरद पवारांच्या पाया पडायला यायचा, त्यांना पुस्तकं द्यायला यायचा. त्यामुळं शरद पवारांविरोधात या व्यक्तीनं वेडीवाकडं विधानं केलेली खपवून घेतली जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

या घटनेला रोहित पवार जबाबदार आहे. लोकशाहीत यांची अशी गुंडागर्दी चालणार नाही. विश्रामबाग वाडा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं नामदेवराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.