शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात

0
62

मुंबई, दि. ४ (पीसीबी) –
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्तास्थापनेसाठी आघाडीमध्ये आले. त्यानंतर दोन पक्षांचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले. जे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते, ते मंत्री झालेले पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीनंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकानंतरही कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

निकालानंतर काहीही होऊ शकतं…
मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवाब मलिक यांनी अनेक दावे केले आहेत. तसेच सध्याच्या राजकारणावर खळबळजनक विधानही केली आहेत. निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे.

… म्हणून मी अजित पवारांबरोबर
महाविकास आघाडीमध्ये असतो तर मला अणुशक्ती नगरमधून तिकीट मिळाले नसते, असेही नवाब मलिक यांनी मुलाखतीत सांगितले. मला अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने माझा राजीनामा घेतला नाही, हे जरी खरे असले तरी त्यानंतर अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर मला मदत केली. त्यामुळे मी आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. जर मी मविआमध्ये थांबलो असतो तर मला तिकीटही मिळू शकले नसते. मी राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकते, याची मला कल्पना आहे. मला तिकीट दिल्यानंतर टीका होईल, याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मला उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात, असे नवाब मलिक म्हणाले.

पक्ष फुटणे ही चुकीची बाब
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे. पण यावर आपल्याला आता काही बोलायचे नाही. अजित पवार यांनी वैयक्तिकरित्या मदत केली, त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर आलो, एवढेच एक कारण आहे. अजित पवार आज भाजपाबरोबर असले तरी त्यांनी त्यांची विचारधारा सोडलेली नाही. तसेच मीदेखील माझी समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी विचारधारा सोडलेली नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केली.