शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं, आमदारांचीच इच्छा

0
71

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) पिंपरी : लोकसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांनी आता काका, पुतण्यानं एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काका, पुतण्यांनी सोबत यावं अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या आमदारांची संख्या वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार महायुतीत काहीसा एकटा पडला आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यानं नुकसान झाल्याचा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाजपशी संबंधित नियतकालिकांचा सूर आहे. त्यामुळे अजित पवार गटात चलबिचल पाहायला मिळत आहे.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा कालच व्यक्त केली होती. राजकारणात काहीही घडू शकतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं. त्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनीदेखील त्याला दुजोरा दिला. आता अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

अजित पवार गटाचा आज पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्ता निर्धार मेळावा पार पडत आहे. या मेळाव्या दरम्यान अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी अण्णा बनसोडे म्हणाले की, अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं मी गेल्या दोन वर्षांपासून सांगत आहे. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा मजकूर असलेला केक कापल्याचा आनंदच आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून व्यक्त केलेल्या भावनांशी मी सहमत आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर फायदाच होईल.