शरद पवार अहमदाबादमधील गौतम अदानींच्या घरी भेटीला

0
305

अहमदाबाद, दि. २३ (पीसीबी) – शरद पवार हे गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील घरी पोहोचले आहेत. शरद पवार हे गौतम अदानी यांच्या घरी पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार हे नेमक्या कोणत्या कारणासाठी गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये, त्यांच्या घरी जावून भेट घेत आहेत, हा प्रश्न असला तरी शरद पवार आणि अदानी यांच्या अहमदाबाद भेटीमागील कारण हे वेगळंच असल्याचंही समोर येत आहे. या आधी गौतम अदानी यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती, यानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर वादंग उठलं होतं.

शरद पवार आणि गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये, अदानी यांच्याच घरी भेट झाली, पण एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार हे गौतम अदानी यांच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. या आधी गौतम अदानी आणि शरद पवार यांची 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती, शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात 2 तास चर्चा झाली होती. गौतम अदानी हे हिंडनबर्ग प्रकरणात चर्चेत आले होते, तेव्हा ही भेट झाली होती. यानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची दुसरी भेट 2 जून 2023 रोजी झाली होती, यात त्यांची अर्धातास चर्चा झाली.

राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
महाराष्ट्रात राजकीय पक्षातील प्रमुख नेते पक्ष सोडून जात असताना, हिंडनबर्ग प्रकरणात गौतम अदानी चर्चेत असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली होती. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र गौतम अदानी यांना सतत निशाण्यावर ठेवून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागणे सुरुच ठेवले आहे. पण शरद पवार आणि गौतम अदानी यांची पहिली भेट झाली तेव्हा या भेटीवर अनेक तर्क काढण्यात आले होते, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा देखील झाली. पण आजची भेट ही गौतम अदानी यांच्या एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार यांनी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा पवार या देखील असल्याने हे एक कौटुंबिक भेट असू शकते, असं सांगण्यात येत आहे.तर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने का असेना ही तिसरी भेट 23 सप्टेंबर 2023 रोजी होत आहे.