शरद पवार अध्यक्षपदी कायम, सुप्रिया सुळे कार्याध्यक्षपदी

0
288

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचे नेते-पदाधिकारी यांची मागणी-आंदोलनं… या गोष्टी मागच्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. अशातच आज या सगळ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडतेय. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शरद पवार हेच पक्षाध्यक्षपदी कायम राहणार असून सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचे ठरले आहे, असे समजले.

राष्ट्रवादीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडतेय. या बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
मुंबईतील प्रदेश कार्यलयाबाहेर राष्ट्रवादीचे हजारो नेते आणि कार्यकर्ते जमले आहेत. हे सगळे लोक शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला केवळ शरद पवार हेच अध्यक्ष हवे आहेत, असं या नेत्या आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.