शरद पवारांच्या पक्षाचे काम केले म्हणून भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना शिस्तभंगाची नोटीस

0
67

सोलापूर,दि. 17 (पीसीबी)
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणारे रणजितसिंह मोहिते पाटील यांना प्रदेश भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदे भाजपचे कार्यालयिन सचिव मुकूंद कुलकर्णी यांच्या सहिने ही नोटीस दिली आहे.
निवडणूक काळात आपल्या घराण्याने भाजपच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रचार दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आले असातना त्यावेळी मोहिते पाटील अनुपस्थित होते. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते कुटुंबाने भाजपचे उमेदवार पाडा अशी जाहीर भूमिका पत्रकार परिषदेत घेतली होती. लोकसभा निवडणुकिच्या दिवशी शरदल पवार गटाचे उमेदवार यांची गळाभेट घेऊन आपण भाजप उमेदवाराच्या विरोधात संदेश दिलात.
विधानसभा निवडणूक काळातसुध्दा आपल्या परिवाराच्या सदस्यांनी शरद पवार यांच्या पक्षाची मफलर गळ्यात घालून भाजप विरोधात प्रचार केला. महायुती सरकारच्या काळात ज्या शंकर सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत केली त्याच कारखान्याचे चिटबॉय याने तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या उमेदवाराचा घरोघरी जाऊन प्रचार केला. पोलिस एजंटला आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, असाही आरोप नोटीसमध्ये केला आहे. या सर्व मुद्यांचे स्पष्टिकरण देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

राम सातपुतेंचा पराभव भाजपला जिव्हारी लागला –
दरम्यान, मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी चेतनसिंह केदार सावंत यांनी केली होती. केदार सावंत यांच्यापाठोपाठ कल्याणशेट्टी यांनीही शिफारस केल्याने मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत जानकर यांच्याकडून राम सातपुते यांना पराभव झाला होता. त्या पराभवानंतर सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्याविरोधात शस्त्र उपसले आहे.

माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली. साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली, त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले. भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पोलिंग एजंटला धमक्या दिल्या, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

भाजपमधून तात्काळ हकालपट्टी करा
रणजितसिंह मोहिते पाटील यांची तत्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी माजी आमदार राम सातपुते यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी केली होती. दरम्यान, पंढरपूर दौऱ्यावर आलेले आमदार श्रीकांत भारतीय यांनी राम सातपुते यांची तक्रार आणि आमदार कल्याणशेट्टी यांनी केलेली शिफारस याबाबत माहिती देत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले होते.