शरद पवारांच्या खेळीने बीडचं राजकारण तापणार; बड्या मराठा महिला नेत्याचा हातात तुतारी, मराठा कार्ड चालणार?

0
111

बीड, दि. 20 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. मेटे या बीड विधानसभेसाठी इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. बीड विधानसभेसाठी पक्षाकडे प्रस्ताव पाठवल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

मी शिवसंग्राम संघटनेची अध्यक्ष आहे. शिवसंग्राम ही एक सामाजिक संघटना आहे. मी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मी बीड विधानसभेसाठी इच्छूक आहे. त्यामुळे यासंदर्भात पक्ष निर्णय घेईल. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी पक्षात प्रवेश केला, असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. जरांगे पाटील काय बोलले ते मला माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्योती मेटे यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे, त्यांना बीडमधून तिकीट मिळणार का? हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं बजरंग सोनवणे यांना तिकिट देण्यात आलं. त्यांनी या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभा केला. त्यानंतर आता ज्योती मेटे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत, यावेळी तरी त्यांना तिकीट मिळणार का?