– गौतम अदानींच्या घरी विशेष बैठक सुरू
मुंबई, दि. 1३ (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर शरद पवार आणि भाजपमध्ये एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांचा गुरुवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 10 दिवसांपूर्वी अजितदादा गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुरुवारी दुपारी दिल्लीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार गटाचा एक बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शरद पवार हे भाजपशी हातमिळवणी करणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते मेहबुब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेहबुब शेख यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले.
शरद पवार गटाचा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे वृत्त तुम्हाला कोणी दिले, माहिती नाही. काल सकाळपासून आम्ही सगळे दिल्लीत शरद पवारांच्या 6 जनपथ निवासस्थानीच होतो. कालपासून शरद पवार कुठेही गेले नाहीत. तसेच आमच्या पक्षाचे कोणी प्रमुख नेते भाजपच्या नेत्यांना जाऊन भेटले नाहीत. शरद पवार गटात कोणतेही दोन गट किंवा वेगवेगळे मतप्रवाह नाहीत. शरद पवार जो निर्णय घेतील तोच सर्व खासदार आणि आमदारांसाठी अंतिम असेल. पण शरद पवार आणि भाजपची बोलणी सुरु असल्याच्या बातम्या कोण पेरतंय, हे माहिती नाही, असे मेहबुब शेख यांनी म्हटले.
शरद पवारांना भेटल्यानंतर आमचे सगळे नेते थेट विमानतळावर गेले: मेहबुब शेख
अजित पवार हे काल शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. त्याचा गैर अर्थ काढायची गरज नाही. भाजपसोबत झालेल्या चर्चेत आमचे कोणते नेते सहभागी होते, हे समजले तर आम्ही त्यावर बोलू शकतो. काल शरद पवार यांना भेटून आमचे सगळे प्रमुख नेते थेट विमानतळावर गेले. मात्र, आता आमचे नेते भाजपच्या नेत्यांना भेटल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. यामधून काही निष्पन्न होणार नाही, या चर्चा केवळ चर्चांपुरताच मर्यादित राहतील, असा विश्वास मेहबुब शेख यांनी व्यक्त केला.
प्रुफल पटेल हे शरद पवारांना भेटले असतील तर ठीक आहे. त्या दोघांनी एकत्र काम केले आहे. पक्ष बदलला म्हणून एखाद्याशी बोलणं बंद करणे, असे राजकारण आम्ही करत नाही. विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी शरद पवारांचा सुसंवाद आहे. पण शरद पवारांची वैचारिक भूमिका वेगळी आहे, असेही मेहबुब शेख यांनी सांगितले.