दि . २२ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट हस्तक्षेप करत कठोर शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यातील या हृदयद्रावक घटनेनंतर सामंत यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं ठोस आश्वासन दिलं. “जे दोषी आहेत, ते लवकरच तुरुंगात जातील,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
वैष्णवीच्या लग्नात दिलेलं सोनं, गाडी आणि इतर गोष्टी असूनही, तिच्या सासरच्यांनी मानसिक छळ केला आणि त्यामुळे तिने आयुष्य संपवलं. याप्रकरणी सुशील हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे हे अद्याप फरार आहेत. या पार्श्वभूमीवर उदय सामंत म्हणाले, “हा क्रौर्याचा कळस आहे. पक्षात असलेल्या कोणालाही गुन्हा करण्याचा परवाना मिळत नाही.”
सामंत यांनी याप्रकरणी पोलिसांची कार्यवाही जलद गतीने होणार असल्याचंही स्पष्ट केलं. “या नीच प्रकारात जे दोन आरोपी फरार आहेत, त्यांच्यासाठी सहा पथकं तयार झाली आहेत. पुढच्या २४ तासांत त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा विश्वास आहे,” असं ते म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे, हेच सरकारचं धोरण आहे.
“मी नेता आहे, राजकारणी आहे म्हणून काहीही करू शकतो, असा गैरसमज समाजात निर्माण होऊ नये. गुन्हेगार कोणताही असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे,” अशा शब्दांत सामंत यांनी सत्ताधाऱ्यांचं मत मांडलं. पोलिसांनी या प्रकरणात दोषींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
उदय सामंत यांच्या भाषणात भावनिक आवेशही स्पष्ट दिसून आला. “हा अमानुष प्रकार आहे. वैष्णवीसारख्या मुलींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सासरच्या मंडळींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हा फक्त एक गुन्हा नाही, हा समाजातील विकृती आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
राज्यभरातून या प्रकरणात जोरदार राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत असताना, सरकारकडून दिली जाणारी ही प्रकाराची ठाम प्रतिक्रिया जनतेत विश्वास निर्माण करणारी ठरते आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांची कारवाई वेग घेईल, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.